अंबरनाथ : येथील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (अंबरनाथ आयटीआय ) मध्ये महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचा ४६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरण साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना ही राज्यातील ४१७ आयटीआय संस्थामधील कार्यरत निदेशकांची संघटना असून १९७९ साली पनवेल येथे स्थापन झाली होती. निदेशकांच्या समस्या सोडवणे, निदेशकांच्या मागण्या शासनामार्फत सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, निदेशकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणे. हे कार्य संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते. तसेच दर तीन वर्षांनी राज्य कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया देखील पार पडते. राज्यातील जवळपास ६ हजार आयटीआय निदेशकांचे नेतृत्व करणारी ही संघटना आहे. संघटनेच्या स्थापनेपासून गेल्या ४५ वर्षांत मुंबई विभागाला संघटनेच्या अध्यक्षपदाने हुलकावणी दिली होती. मात्र याचवर्षी अंबरनाथ आयटीआयमधील विनोद पाटील यांना अध्यक्ष पद देखील मिळाले आहे. सोमवारी संघटनेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त नामफलकाला पुष्पहार अर्पण करून तसेच उपस्थित निदेशकांना पेढे भरवून आनंदाने हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, शाखा अध्यक्ष संतोष सावंत, शाखा सचिव दीपक चौधरी तसेच मोठ्या संख्येने आयटीआय निदेशक उपस्थित होते.























