बदलापूर : बदलापूरमध्ये भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर गुरुवारी गोळीबाराची घटना समोर आल्याने एकच मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी ३ जुलै रोजी दुपारी अंदाजे साडेतीनच्या सुमारास बदलापूर बोराडपाडा रस्त्यावर आमदार किसन कथोरे यांच्या बदलापुरातील निवासस्थानासमोरील जाणाऱ्या रस्त्यावर एका इसमावर गोळीबार झाला असून त्याला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. तक्रारदार भाजी आणण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी त्याच्यावर काही अज्ज्ञातांनी पाठीमागून दोन राऊंड फायर केल्याची माहिती मिळते. यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार आहेत.
तक्रारदार आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र असल्याचे समजते. तसेच जो जखमी तक्रारदार आहे त्याच्यावर याअगोदर एक गुन्हा, तर ज्याने गोळीबार केला त्याच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. उल्हासनगर झोन आणि ठाणे क्राइम ब्रांच यांची पथके तपासासाठी रवाना झाली असून या घटनेमागील मूळ उद्देश काय आहे, याचा खुलासा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली.























