बदलापूर : शहरातील नामांकित प्रभू बा एकता ध्यान योग ट्रस्ट यांच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या विविध शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले. नव्या कोऱ्या वह्या हातात घेतल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह वाढलेला दिसून येत होता. यावेळी विद्यार्थ्यांचे लाडके नुकतेच सेवानिवृत्त झालेले पालिकेचे माजी शिक्षण विभागप्रमुख विलास जडे यांची उपस्थिती विद्यार्थ्यांमध्ये आणखीन जोश भरणारे होती. कात्रप, शिरगाव, आपटेवाडी, शिरगाव वाजपे, मानकिवली येथील शाळांमधील एकूण ३५० हून अधिक विद्यार्थ्यांना २०० डझन वह्यांचे वाटप प्रवीण त्रिवेदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड व शिक्षण विभाग प्रमुख जितेंद्र गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या शाळा कात टाकत आहेत. या शाळांची पटसंख्या वाढत असून, विविध उपक्रम आणि आधुनिक शिक्षण पद्धती यामुळे पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होत आहे.























