मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना अत्यंत दुर्देवी घटना घडली. य या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेवर रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आपोआप दरवाजे बंद होणाऱ्या नव्या लोकलचा समावेश केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.या घटनेनंतर स्वप्नील निला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासून खाली पडले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर प्रवास करत होते. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय
निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत येतील. आयएफसीएद्वारे सध्या लोकलला दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे गांड्याचे दरवाजे आपोआप बंद होतील.
रेल्वे अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ
मिळालेल्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेवर ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मार्गावर १ जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान रेल्वे अपघातात आतापर्यंत एकूण ६६३ जणांचा मृत्यू झाला. यातील २७२ जण धावत्या लोकलमधून पडल्याने आणि ३९१ जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे.























