बदलापूर:- मुंबईतील लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अंबरनाथ बदलापूर या परिसरातूनही मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त दररोज मुंबईला ये-जा करतात. लोकल ट्रेनमधील गर्दी आणि रेटारेटीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून मेट्रो थेट बदलापूरपर्यंत धावणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईन 14 च्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना नव्या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. मेट्रो १४ प्रकल्पाचा विस्तार केला जाणार असून ही मेट्रो चिखलोली रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरून जिएनपी मॉलपर्यंत जाणार आहे.मेट्रो ५ आणि मेट्रो १४ या प्रकल्पांच्या विस्तारित टप्यांमुळे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि बदलापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि लोकल गाड्यांवरील ताण कमी होईल.पीपीपी म्हणजेच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर ही मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.तसेच,मेट्रो ५ ही ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गे दुर्गाडी नाक्यापासून बिर्ला महाविद्यालय मार्गे होणार आहे.यामुळे या भागातील रहिवाशांना थेट आणि जलद मेट्रो सेवा मिळणार असून, चिखलोली हे एक प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित होणार आहे. सोबतच चिखलोली रेल्वे स्थानकात रेल्वे आणि मेट्रो सेवांचे एकत्रीकरण होणार असून, येथील स्थानक आधुनिक आणि सुसज्ज पद्धतीने उभारले जाणार आहे. यासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएला दिल्या आहेत.सुरुवातीला मेट्रोच्या कामासाठी पीपीपी तत्त्वावर उभारणीसाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महिन्या अखेरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहेत. या मेट्रो 14 मार्गाचे काम एमएमआरडीए करणार आहे.एमएमआरडीएच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. या बैठकीला अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही या प्रकल्पासाठी मागणी केली होती.























