बदलापूर (प्रतीक टोपले) गेल्या आठवड्याच्या शेवटी बदलापूर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस पडला.या पावसाचा मोठा फटका भातशेतीला बसला असून कापणीसाठी तयार होत असलेली शेती कोसळली आहे. यामुळे या वर्षी भात पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे भीती व्यक्त होत आहे.
बदलापूर शहरातील आसपासच्या ग्रामीण भागामध्ये भातशेती मोठ्या प्रमाणत केली जाते.बदलापूरमधे ऑक्टोबर महिना आला तरीही पावसाचा जोर मात्र कायम आहे.या महिन्यामध्ये शेतकरी कापणीसाठी शेतात उतरतात पण यंदाच्या पावसामुळे भात शेतीची कापणी झालेली नाही.
ह्या प्रकरणी
जांभळे गावातील स्थानिक शेतकरी प्रभाकर टोपले यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून अधून-मधून विजांच्या कडाक्यासह जोरदार पाउस कोसळत आहे.वारा पाऊस जोराने सुरु असल्याने याचा मोठा फटका भात शेतीला बसला आहे.
कृषी विभागाने शेतीची लवकरात लवकर पाहणी करून योग्य ते उपाय सुचवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जेणेकरून शासन लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेईल.
कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या मार्फत कापणीस आलेल्या भात शेती नुकसानीचे पाहणी सुरू असल्याची माहिती देखील आदर्श बदलापूरला प्राप्त झाली आहे.

















