मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे .परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी ४ सप्टेंबर, तर १९ महानगरपालिका आणि २५० पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना १ सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक राज्य शासनाने तयार केले आहे. सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.११ जूनपासून प्रभाग रचनेच्या कार्यवाहीला सुरुवात झाली असून त्यासाठी १६ जूनपर्यंत वेळ देण्यात आला आहे. २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. वेळापत्रकानुसार मुंबई आणि अ, ब क आणि ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायत व नगर परिषदेच्या प्रगणक गटाची मांडणी आणि प्रभाग रचनेची तयारी बुधवारी ११ जूनपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यातील या कार्यक्रमाला १६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच मुंबईसह अ, ब, क वर्गाच्या महापालिकांना २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान तर ड वर्गाच्या महापालिका आणि नगर परिषद व नगरपंचायतींना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी लागणार आहे. नगरविकास विभागाने दोन दिवसांपूर्वी प्रभाग रचनेसंदर्भात आदेश जारी केल्यानंतर गुरुवारी त्याबाबत नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रभागांची रचना करण्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात एक पत्र महापालिका आयुक्त, नगर परिषदा व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.























