बदलापूर : शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर सिग्नल येताना उभारण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी ठीक ठिकाणी आता वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुख्यतः शहरातील पश्चिम भागातील रस्ते हे अरुंद आहेत एकावेळी केवळ दोन वाहने जाऊ शकतात अशावेळी जर वाहनांना डावीकडे वळण घ्यायचे असेल तर मात्र त्यांना सिग्नल असूनही वळण घेता येत नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे शहरातील अरुंद रस्ते.
शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा रेल्वे उड्डाणपूल आणि बेलवली येथील भुयारी मार्ग या दोन मार्गावर दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शाळा सुटण्याची वेळ असल्याने स्कूल बसेस मोठ्या प्रमाणात या भागातून ये जा करीत असतात अशावेळी रस्त्यावर केवळ दोन वाहने एका वेळी जाऊ शकतात. अशा स्थितीमध्ये डावीकडे सिग्नल चालू असतानाही वाहन चालकाला डावीकडे जाता येत नाही.
कल्याण बदलापूर रोड ज्या पद्धतीने अंबरनाथ शहरांमध्ये रुंद करण्यात आला आहे तोच रस्ता बदलापूर शहरात आल्यानंतर मात्र अरुंद होतो. अरुंद रस्त्यामुळे सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी याकरिता सिग्नल यंत्रणा उभारण्यात आले आहे की वाहतूक समस्या अधिक गडद व्हावी याकरिता उभारण्यात आली आहे असा प्रश्न या निमित्ताने वाहन चालकांना पडत आहे.
बेलवली येथून गणेश चौककडे जाताना असलेला सिग्नल हा डावीकडे जाण्याकरिता सुरू असतो परंतु रस्ता अरुंद असल्याने इतर वाहनांमुळे डावीकडे जाणाऱ्या वाहनांना जाणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये ज्या भागात यापूर्वी वाहतूक कोंडी होत नव्हते त्या भागात देखील आता वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शहरातील विविध भागात उभारलेली सिग्नल यंत्रणा सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू आहे अशावेळी अरुंद रस्ता आणि वाहतूक कोंडी याचा विचार होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा वाहतूक समस्येवर तोडगा म्हणून उभारण्यात आलेली यंत्रणा अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होऊ शकते.























