मुंबई: लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांत केंद्रिय तिकीट तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यातून १६ जून ते २४ जून या कालावधीत १०३ गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली. त्यावेळी ९८४ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ३.१८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला . मध्य रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात विनातिकीट प्रवासी वाढल्याने त्या डब्यातील तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथके, आरपीएफ कर्मचाऱ्यांसह गर्दीच्या वेळेत लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये पथक तैनात करण्यात आले. प्रत्येक पाळी (शिफ्ट) मध्ये सरासरी ४१ तिकीट तपासणी कर्मचारी आणि ७आरपीएफ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनियोजित तपासणी करण्यात आली. लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांत अनधिकृत, विनातिकीट प्रवाशांची गर्दी वाढल्याच्या तक्रारी सातत्याने मध्य रेल्वेकडे दाखल होत होत्या. त्यामुळे रेल्वे विभागाकडून हे पाऊल उचलण्यात आले . अनेक प्रथम श्रेणीतील प्रवाशांनी रेल्वेच्या सक्रिय प्रयत्नांचे कौतुक केले आणि अनेकांनी अनधिकृत प्रवाशांची ओळख पटवून देण्यात आणि दंड वसूल करण्यात तैनात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. सर्व प्रवाशांना योग्यरित्या तिकिटे किंवा पास घेऊन प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेद्वारे करण्यात आले.























