बदलापूर : बदलापूर नगरपालिकेत एक हाती सत्ता यावी याकरिता भारतीय जनता पक्षाने आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आपला मित्र पक्ष असलेला शिवसेना यासोबत चुरशीची लढत असल्याने भाजपने आपले सर्वस्व पणाला लावलेले दिसून येत आहे. अशावेळी मात्र भारतीय जनता पक्षास अपशकुन देणारी बातमी मुरबाड येथून आली आहे. भाजपाच्या बारा पैकी नऊ सदस्यांनी पक्षास सोडचिट्टी देत आपला वेगळा गट स्थापन केला असून त्यास जिल्हाधिकारी यांनी नुकतीच मान्यता देखील दिली आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार किसन कथोरे अनेक वर्षे आमदार आहेत. येथील मुरबाड नगर पंचायतीवर भाजपचा वरचष्मा राहिली आहे. गेल्या निवडणुकीतही एकूण १७ नगरसेवकांपैकी भाजपच्या १० नगरसेवकांचा विजय झाला. तर शिवसेनेच्या वाट्याला ५ जागा आल्या. त्याचवेळी दोन इतर नगरसेवक निवडून आले. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडून आला. मात्र काही दिवसांपूर्वी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत येथे भाजपात धुसपूस असल्याचे समोर आले. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाला उपनगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने भाजपच्याच नगरसेवकांनी विरोध केल्याची चर्चा होती. त्याविरूद्ध नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीतही उपनगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवाराला भाजप नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाला. हा स्थानिक भाजपला मोठा धक्का होता.
त्यानंतर येथील नगरसेवकांनी मुरबाड परिवर्तन पॅनल पॅनल अशी स्वतंत्र आघाडी तयार केली. त्याच्या नोंदणीसाठी २६ मे रोजी नगरसेवक मोहन गडगे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही करण्यात आला होता. अखेर ९ जून रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मुरबाड परिवर्तन पॅनलला स्वतंत्र गटाची मान्यता दिली आहे. नऊ नगरसेवकांचा हा गट आता पालिकेत अस्तित्वात असेल. हा स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जातो. आता भाजपच्या गटात भापजचा एक आणि समर्थक दोन असे तीनच नगरसेवक असतील.
नगरपालिका निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षास आणि विशेषता आपले एक हाती वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदार किसन कथोरे यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.























