ठाणे : मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. सदर घटनेत ट्रॅकवर पडल्यामुळे ४ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे व ९ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, येथे दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून अपघातात ज्या 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटूंबीयांना मदत म्हणून आम्ही 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. याशिवाय जखमींना 50 हजार, एक लाख किंवा दोन लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांचा सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय ज्युपिटरला जे दोन रुग्ण गंभीर आहेत, त्यांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
या हृदयद्रावक दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही सांगितले.
या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य आणि जखमींना मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ही घटना कशी घडली, याबाबत चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
रेल्वेचे काही महत्त्वाचे निर्णय
मुंबई उपनगरासाठी उत्पादन सुरू असलेल्या सर्व रेकमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सुविधा असतील. मुंबई उपनगरातील या रेकमध्ये सेवेत असलेल्या सर्व रेकची पुनर्रचना केली जाईल आणि दरवाजे बंद करण्याची सुविधा दिली जाईल, असं मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नवीन गाड्या येणार आहेत त्या सर्व ऑटोमॅटिक डोर क्लोजेससोबत फिटमेंटने येणार आहेत. आयसीएफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलला रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती स्वप्नील नीला यांनी दिली.























