ठाणे : जमिनीची मोजणीकरून त्याची हद्द निश्चित करण्याचे काम प्रशासनातील भूकरमापकांच्या माध्यमातून केले जाते. मात्र, अनेकदा हे कर्मचारी जमिनीचा शोध न लागल्याचे कारण देतात. शिवाय, जमीन मोजणीसाठी उशिरा पोहोचत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या हालचालींवर यापुढे नजर ठेवली जाईल.यासाठी जिल्हा प्रशासनाने भूकरमापकांना मोजणी वेळी जाताना संबंधित भूधारक व स्थानिक कार्यालयाला थेट स्थान ( लाइव्ह लोकेशन) देणे बंधनकारक राहील.
जमीन मोजणी करून सीमानिश्चितीचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे शेतकऱ्यांना तसेच इतर भूधारकांना जमिनीचे व्यवहार करताना वा भरपाई प्रक्रियेत अडथळे निर्माण होत नाहीत. यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची शासनाच्या माध्यमातून मोजणी करून त्याची सातबाऱ्यावर नोंद करून घेतली जाते. सध्या जमीन मोजणीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर मोजणीची आगाऊ नोटीस दिली जाते. मात्र, अनेकदा भूकरमापक जागेवर उशिरा पोहोचतात वा अर्जदारांचा त्यांच्याशी थेट संपर्क होत नाही, त्यामुळे गैरसमज व अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणून आता भूकरमापक मोजणीस्थळी जाण्यापूर्वी आपले थेट स्थान संबंधित अर्जदार, लगतधारक व कार्यालयप्रमुख ‘व्हॉट्सअॅप’ वर बंधनकारक असेल.
जिल्हा प्रशासनाने भूमी अभिलेख विभागामार्फत ई-मोजणी, इप्सित पोर्टलवरील ऑनलाइन फेरफार सुविधा, ‘प्रत्यय’ प्रणालीद्वारे ऑनलाइन अपील अर्ज दाखल करण्याची सुविधाही सुरू केली आहे. या सर्व सुविधा ‘महाभूमी’ पोर्टलवर उपलब्ध आहेत. नागरिकांनी या तंत्रस्नेही सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांनी केले आहे.























