बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर सुरू असलेल्या विकासकामांचा फटका पावसाळ्यात प्रवाशांना बसत आहे. पादचारी पुलाच्या कामासाठी स्थानकातील शेड काढल्यामुळे प्रवाशांना एकतर पावसात भिजावे लागते किंवा छत्र्या सांभाळत लोकल पकडण्याची कसरत करावी लागत आहे. दोन वर्षांपासून बदलापूर स्थानकात विकासकामे सुरू आहेत. नवीन, विस्तीर्ण पादचारी पूल उभारले जात आहेत. मात्र, कामाची गती संथ असल्यामुळे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे. बदलापूर स्थानकात निम्म्या प्लॅटफॉर्मवर पत्र्याची शेड नसल्यामुळे प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी कसरत करावी लागते.बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दी नियंत्रण आणि सुविधा उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे प्रवाशांना दिलासा मिळताना दिसत नाहीए. मात्र अपुऱ्या आणि संथगतीच्या कामांमुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत. सध्या पावसामळे प्रवाशांना फलाट क्रमांक एक आणि दोन वर भिजतच उभे राहावे लागते आहे. काही ठिकाणी छप्पर असूनही ते अपुरे असल्याने एकतर पावसापासून रक्षण किंवा लोकलमध्ये जागा अशी काहीशी बदलापूरकर प्रवाशांची स्थिती आहे.तर स्थानकाबाहेरही पूर्व भागात पाणी साचत असल्याने प्रवाशांना कसरत करत स्थानक गाठावे लागत आहे . त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे . स्थानकात पादचारी पुलासाठी जो खड्डा खोदला आहे त्यातली माती स्थानकात पसरली आहे. या मातीत पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. होम प्लॅटफॉर्ममुळे बदलापूर स्थानकात आलेली लोकल ही प्रवाशांना दोन्ही बाजूला उतरण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, फलाट क्रमांक एक प्रवाशांसाठी बंद केल्याने आता होम प्लॅटफॉर्मवरच प्रवाशांना उतरावे लागते. स्थानकात प्रवाशांना समस्यांचा सामना करत असताना स्थानकाबाहेर पडल्यानंतरही प्रवाशांच्या समस्या संपताना दिसत नाहीत. बदलापूर स्थानकाबाहेर पूर्वेला मुख्य रस्त्यावर पाणी साचत असल्याने स्थानकातून बाहेर पडल्यानंतर लांब उड्या किंवा कठड्यावरची कसरत करावी लागते आहे. तर पश्चिमेला स्थानकातून बाहेर पडल्यानंतर थेट वाहतूक कोंडीत जाऊन प्रवासी अडकत आहेत. त्यामुळे बदलापुरकरांच्या नशिबी रेल्वे प्रवासात अडचणींची सर्कस सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.























