बदलापूर:- पर्यटकांसाठी बदलापूर मुरबाड हा बारवी धरणामार्गे जाणारा रस्ता महत्वाचा आहे. तसेच मुरबाड तालुक्यातील अनेक गावे, अंबरनाथ तालुक्यातील गावांतील ग्रामस्थांसाठी बदलापूर आणि आसपासच्या शहरात येजा करण्यासाठी हा मार्ग फायद्याचा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर राहटोली ते मुळगाव, पुढे सोनावळेपर्यंत आणि बारवी धरणाच्या जवळ पिंपोळी ते धरण या पट्ट्यात काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पिंपळोली भागात सुरू असलेल्या खोदकामामुळे अपघाताचीही भीती व्यक्त होते आहे. पावसाळी पर्यटनासाठी महत्वाचा आहे. अनेक पर्यटक या रस्त्यावर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. परंतु बदलापूर मुरबाड रस्त्यावर बारवी धरणापर्यंतच्या पट्ट्यात विविध ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या मार्गावरची मुळगावमार्गे होणारी वाहतूक बोराडपाडा रस्त्यावरून होते आहे. पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या रस्त्याने प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या येथून वाहतूक करताना स्थानिक ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते आहे. रस्ता कॉक्रिटीकरणासोबतच काही भागात रस्त्यातील चढ उतार कमी केले जात आहेत. त्यामुळे रस्ता काही ठिकाणी समान पातळीवर येईल. या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याचा निम्मा भाग आणि वापरात असलेला रस्ता यातील फरक मोठा आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून प्रवास करताना अपघाताची भीती व्यक्त होते आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलही मोठ्या प्रमाणावर होतो आहे. काम सुरू असलेल्या काही भागात एका वेळी एकच वाहन येजा करू शकते. त्यामुळे काही ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे.























