बदलापूर : मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभाराचा फटका अनेकदा बदलापूरकर प्रवाशांना सहन करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून विशेषतः बदलापूरकरांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. प्रवासी आणि रेल्वे प्रवासी संघटनांना विश्वासात न घेता करण्यात येणाऱ्या नियोजनामुळे फलाट आणि पादचारी पुलांवर प्रवाशांना सुटसुटीत मार्गाऐवजी चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.
अनेक भागांत शेडअभावी प्रवाशांना ऊन-पावसात उभे राहावे लागते. यातच मागील काही दिवसांपासून लोकल उशिराने धावण्याचे प्रकार वाढले आहेत. बदलापूर स्थानकाची क्षमता कमी असल्याने एखादी लोकल पाच मिनिटे जरी उशिराने आली तरी पुढच्या लोकलचे प्रवासी स्थानकात येतात. त्यामुळे अभूतपूर्व गर्दी होते. मात्र बदलापूर स्थानकावरून श्वास कोंडणारा प्रवास करणारे हजारो प्रवासी व प्रवासी संघटनांच्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, भविष्यात मुंब्र्यासारखी एखादी घटना घडल्यावरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त प्रश्न रेल्वे प्रवासी उपस्थित करत आहेत .
बदलापूर शहरांतून सर्वाधिक नोकरदार रेल्वेने प्रवास करतात , दिवसेंदिवस या प्रवासीसंख्येत वाढ होत आहे. मात्र, गर्दीच्या वेळी रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीने खच्चून भरलेल्या लोकलमधून प्रवास करावा लागत आहे. दररोज होणारे लहानमोठे अपघात आणि सततच्या मागणीनंतरही वाढीव रेल्वे फेऱ्या आणि मूलभूत सुविधांबाबत रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत .























