पुणे: सध्या फक्त पुणे- एर्नाकुलम एक्सप्रेस ही एकमेव गाडी कोकण मार्गे पुण्याहून धावत असून तीही आठवड्यात फक्त दोन दिवसच आणि मोजक्याच स्थानकांवर थांबते. त्यामुळे या सेवा अपुऱ्या पडतात. त्यामुळे पुणे-कोकणसाठी विशेष गाडी सुरू करावी किवा नांदेड-पुणे-पनवेल एक्सप्रेसचा विस्तार सावंतवाडीपर्यंत करावा, अशी मागणी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी केली आहे.पुण्याहून सावंतवाडीपर्यंत नवीन रेल्वे सेवा सुरू करावी, किंवा सध्या सुरू असलेली नांदेड-पुणे-पनवेल ही दैनिक गाडी सावंतवाडीपर्यंत वाढवावी, जेणेकरून पुण्यात राहणाऱ्या लाखो कोकणी बांधवांना याचा लाभ होईल,अशा आशयाचे निवेदन मंत्री मुरलीधर मोहोळ यांना सादर करण्यात आले आहे. त्याचबरोबर, सावंतवाडी टर्मिनस रेल्वे स्थानकावरील समस्या दूर करून या स्थानकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ‘अमृत भारत स्थानक योजना’त त्याचा समावेश करण्यात यावा, अशीही मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
या गाडीसाठी एका अतिरिक्त रेकची सोय करून तिचा विस्तार केला गेल्यास मराठवाडा-पुणे-कोकण अशी कनेक्टिव्हिटी मिळेल. या गाडीचा विस्तार करताना तिला पेण, नागोठणे, रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे. याशिवाय ही गाडी पुणे-कर्जत-कल्याण- पनवेल या मार्गाने चालविण्यात यावी. जेणेकरून ‘लोको रिव्हर्सल’ साठी लागणारा वेळही वाचेल आणि कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या प्रवाशांचीही सोय होईल, यासाठीच नांदेड-पुणे-पनवेल या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आलेली आहे.























