अंबरनाथ : शाळेचा पहिला दिवस आणि तोही नवा कोऱ्या इमारतीत म्हणजे विद्यार्थ्यांकरिता हा एक आनंदाचा क्षण. शाळेत गेल्यानंतर आपला कोणता वर्ग असेल, कोणता बेंच असेल याची उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्याला असते. अंबरनाथ मधील शाळा क्रमांक १ आणि १३ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना केवळ नवीन
वर्ग बेंच नव्हे तर संपूर्ण शाळाच नव्या कोऱ्या स्वरूपात मिळाली त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
अंबरनाथ पालिकेच्या १७ शाळा असून जवळपास १८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळा क्रमांक १ आणि १३ क्रमांकाच्या शाळेची दुरवस्थेतील जुनी इमारती जमिनदोस्त करत शाळेच्या भव्य इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ९ कोटींचा निधी मंजूर केला होता. जुन्या इमारतीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन आणि अत्याधुनिक वर्ग, नवीन बाकडे, स्वच्छ शौचालय, मैदान, उद्यान, विविध आकर्षक संदेश आणि चित्रांनी रंगवलेल्या भिंती, वातानुकूलित कार्यालय अशा शाळेत वावरताना विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करत एका विद्यार्थ्यांच्या शुभपावलाचा वर्गात ठसा उमटवण्यात आला.
अंबरनाथ नगरपरिषद शाळा क्रमांक १, १३ आणि ११ चा लोकार्पण सोहळा मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व छत्रीचे वाटप देखील करण्यात आले.























