बदलापूर: मागील वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार भाजपचे कपिल पाटील आणि विधानसभेसाठी भाजपचे किसन कथोरे हे उमेदवार असताना दोन्ही निवडणुकांच्या वेळी बदलापूर शहरात भाजप आणि शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये बेबनाव आणि अंतर्गत कुरघोड्या पाहायला मिळाल्या. याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बसला, बदलापूर शहरातून कपिल पाटील आणि किसन कथोरे यांना जास्तीत जास्त मते मिळावीत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि काम महत्त्वाचे ठरते. पक्षाची धुरा प्रदेश सरचिटणीस व परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशीष दामले यांच्याकडे होती. त्यांनी पक्षातील इतर कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून घरोघरी भेटीगाठी, बैठका, सभा या माध्यमातून महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. महायुतीचा धर्म आम्ही पाळला आहे. आता महायुतींच्या भाजप आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांनी आगामी पालिका निवडणुकीत बदलापूरच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही राष्ट्रवादीला द्यावी, अशी इच्छा कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केली आहे.लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीमधील प्रमुख तीन पक्षांपैकी भाजप-शिंदे सेनेत स्थानिक स्तरावर थोड्या कुरघोडी आणि बेबनाव पाहायला मिळाला. महायुतीचा हा धर्म पाळून आम्ही भाजपच्या उमेदवारांसाठी जीव तोडून मेहनत केली. त्यामुळे आगामी बदलापूर पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा असावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशीष दामले यांनी केली आहे. नुकत्याच शहरातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप शिबिरात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.
बदलापूरसारख्या शहरात जिथे शिंदे सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. असे असताना राष्ट्रवादीची ही मागणी इतर दोन्ही पक्षांना मान्य होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.























