पालिकेच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
दर्शन सोनवणे
अंबरनाथ : शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे, अपूर्ण गटारीचे काम, विविध कारणांमुळे खोदलेले रस्ते, वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि रेल्वे स्थानिक परिसरातील अतिक्रमण यामुळे त्रस्त झालेल्या रिक्षा चालक-मालक संघटनेने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला. शेकडोंच्या संख्येने जोशींकाका / रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेने अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच यावेळी संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी थेट पालिकेची सुरक्षा यंत्रणा भेदून पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवले. अखेर पालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
यापूर्वी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने पालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये गॅस लाईन, सीसीटीव्ही केबल आणि लाईट केबलसाठी रस्त्यांवर केलेले खोदकाम, महात्मा गांधी रिक्षा स्टँडजवळील गटाराचे अपूर्ण काम, तसेच मुख्य रिक्षा स्टँडमध्ये वाढलेल्या झाडांच्या फांद्या, रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंना टोपलीधारक आणि फेरीवाले यांच्यामुळे रहदारीस अडथळा अशा विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. तसेच मागण्या मान्य न झाल्यास १६ जून पासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र पालिका प्रशासनाने अद्याप समस्या सोडवल्या नसल्याने पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले असून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी घेतला. अखेर उप मुख्याधिकारी उमेश राऊत आणि शहर अभियंता राजेश तडवी यांच्यासोबत चर्चा होऊन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. शहरात विविध कारणांमुळे खोदण्यात आलेले खड्डे भरण्यासाठी शासनाकडे एकत्रित प्रस्ताव सादर करण्यात येणार असून २१ जूनपासून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे काम हातीं घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन पालिका प्रशासनाने दिले.























