दर्शन सोनवणे
अंबरनाथ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोहोज गाव येथील वनक्षेत्रात अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट व वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने ५०,००० सीडबॉलच्या रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी ठाणे व रायगड जिल्ह्याच्या विविध भागातील अनिरुद्ध बापूंच्या अनुयायांनी विविध स्थानिक प्रजातीच्या बियांपासून ५० हजार हून अधिक सिडबॉल तयार करण्यात आलेले होते. या सर्व सिडबॉल रोपणासाठी वनविभागाच्या मदतीने अंबरनाथ तालुक्यातील कोहोज गावच्या मोहन नॅनो इस्टेट या गृहप्रकल्पामागे असलेल्या विस्तीर्ण अशा राखीव वनक्षेत्राची निवड करण्यात आलेली होती, यावेळी विविध वयोगटातील २०० पेक्षा अधिक महिला व पुरुष अनिरुद्ध बापूंच्या अनुयायांनी सहभाग नोंदवून वनपरिक्षेत्र अधिकारी बदलापूर संजय धारवणे व वनपरिमंडळ अधिकारी अंबरनाथ वैभव वाळिंबे यांचे मार्गदर्शनाखाली ५० हेक्टर परिसरात ५० हजार सिडबॉलचे रोपण करण्यात आले.
यावेळी जंगल परिसरात सिडबॉल रोपणाचे काम करताना साप व इतर वन्यजीवांपासून सहभागी नागरिकांच्या संरक्षणासाठी WARR संस्थेचे स्वयंसेवक व आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टर, नर्स यांचेही पथक तैनात करण्यात आले होते. विकासासोबतच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून प्रत्येकाने पर्यावरणासाठी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी बदलापूर संजय धारवणे यांनी केले,नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संवर्धनाची आवड निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचे उपक्रम फायदेशीर असल्याबाबत मत सहभागी नागरिकांनी व्यक्त केले.
वनविभागाच्या व स्थानिक जागरूक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे कोहोज खुंटवली परिसरातील डोंगरावर वृक्ष आच्छादन वाढलेले असून वन्य पशु पक्ष्यांचीही संख्या वाढलेली दिसून येत आहे.
– निखिल वाळेकर, माजी नगरसेवक
बीजअंकुरणासाठी सध्या पोषक वातावरण असल्याने सिडबॉल मधील बीज अंकुरण यशस्वी होऊन त्यापासून रोपेनिर्मितीची टक्केवारी निश्चितच चांगली राहील.- वैभव वाळिंबे,वनपरिमंडळ अधिकारी अंबरनाथ























