कु.ब.न.पा.च्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणाचे मार्गदर्शन शिबिर संपन्न
बदलापूर : येथील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या आदर्श उर्दू शाळा (कुळगाव) मधील माध्यमिक विभागातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमात मुंबईमधील अंजुमन-ए-इस्लाम अकबर पीरभाई कॉमर्स अँड इकॉनॉमिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. शौकत अली सर यांनी विद्यार्थ्यांना नववर्षातील अभ्यासाचे नियोजन, दहावी नंतर उपलब्ध अभ्यासक्रम, उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या संधी याविषयी माहिती दिली.
उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचीही माहिती या शिबिरामध्ये देण्यात आली. आपल्या तीस वर्षांच्या अनुभवातून डॉ. शौकत अली सरांनी शिक्षणाचे महत्त्व, समाजसेवा व देशसेवा यांचा परस्परसंबंध याविषयी मोलाचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. अभ्यास आणि जबाबदारी यांचा परस्परसंबंध समजावून सांगताना, घर, समाज आणि देशासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
या संकल्प समारंभात शाळेचे मुख्याध्यापक सिकंदर सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नोफिल सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खालिद भाई, समीर भाई, केसर भाई गोरेगाव,डॉ.याकूब शेख, रशीद चाचा,कैसरजहाँ शेख मॅम,खालिद सर ,तसेच इतर मान्यवर शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, डॉ. शौकत अली सरांचे विचार व मार्गदर्शन त्यांच्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे.
या कार्यक्रमास मुख्याधिकारी मारुती गायकवाड, शिक्षण विभाग प्रमुख जितेंद्र गोमासे , केंद्र प्रमुख सोळसे सर आणि जामनिक सर यांचाही शुभेच्छा संदेश लाभला.























