बदलापूर: बदलापूर स्थानकात काही दिवसांपूर्वी पहाटे कर्जतकडून येणारी व मुंबईकडे रवाना होणारी ५.२५ वाजताची लोकल उशिरा आल्याने अनेक संतप्त प्रवासी रेल्वे रुळावर उतरले होते. आधीच कल्याण ते बदलापूर या पट्ट्यात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थिती लोकलच्या फेऱ्या गर्दीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहेत. त्यामुळे ज्यादा लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी गेल्या १० ते १२ वर्षांपासून होत आहे; मात्र कल्याणपुढे कर्जतपर्यंत दोन-चार मार्गिका असल्याने लोकल वाढवणे शक्य नसल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी मंजुरी मिळूनही काम संथगतीने सुरू आहे.लोकलची वाढती गर्दी, त्यात फेऱ्या कमी आणि लोकल वेळेवर येत नसल्याने प्रवाशांचा होणारा संताप यामुळे तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेची लवकर बांधणी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. ही समस्या दूर होईपर्यंत पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या एक्स्प्रेसला बदलापुरात थांबा देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. यासंबंधीचे पत्र मुंबईच्या रेल्वे विभागालाही दिले आहे.त्यात बदलापूर स्थानकात अद्ययावतीकरणाचे काम सुरू असल्याने याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हा त्रास कमी व्हावा यासाठी तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे या मार्गावरील लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस बदलापूर स्थानकात थांबवण्याची मागणी राम पातकर यांनी केली आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीतून थोडा तरी दिलासा मिळेल आणि नियोजन साधले जाईल. तसेच बदलापूरला टर्मिनस स्टेशन घोषित करण्याची मागणी राम पातकर यांनी केली. यासंबंधीचे निवेदन राम पातकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठवले असून, ते रेल्वेमंत्र्यांना ट्विटदेखील केले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या विषयासंबंधी लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचेदेखील राम पातकर यांनी सांगितले.























