लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने मिळाले नियुक्तीपत्र
आमदार किणीकर आणि मुख्याधिकार्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप
अंबरनाथ (दर्शन सोनवणे ) : नगरपालिकेतील सेवानिवृत्त, मयत, स्वेच्छानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर वारसा हक्काने सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. बुधवारी (ता.२५) रोजी आमदार डॉ.बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते निकषांची पूर्तता करणाऱ्या ५२ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कर्मचारी पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्याचे प्रकरण मागील अनेक वर्षे न्यायप्रविष्ठ होते. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनेक वर्षे सफाई कामगार पदावर नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने लाड समितीच्या शिफारशीनुसार अंबरनाथ नगरपालिकेतील सेवानिवृत्त, मयत, स्वेच्छानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कर्मचारी नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये १३६ पैकी नियुक्तीच्या निकषांची पूर्तता केलेल्या एकूण ५२ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क पध्दतीने गट ‘ड’ अंतर्गत सफाई कामगार पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अनेक वर्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वारसांना नियुक्ती पत्र मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आंनद दिसून आला. तर इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी देखील आवश्यक निकष आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना देखील लवकरच नियुक्ती पत्र देण्यात येईल, तसेच त्यांच्या कागदपत्रांमधील त्रुटी सोडवण्यासाठी येत्या सोमवारी पालिकेत कॅम्प देखील घेण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी उप नगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्यासह इतर माजी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी कर्मचारी, तसेच नवनियुक्त सफाई कामगार आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.























