सर्पमित्र गोहिल यांनी नैसर्गिक अधिवासात केली मुक्तता
दर्शन सोनवणे
अंबरनाथ : पूर्व भागातील रिलायन्स रेसिडेन्सी सोसायटीच्या पार्किंगमध्ये रविवार (ता.१) रोजी सकाळी अंदाजे पाच फूट लांबीचा दुर्मिळ तस्कर जातीचा साप आढळून आला. यावेळी नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सापाची माहिती मिळताच तात्काळ सर्पमित्र आकाश गोहिल यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तस्कर सापाला सुरक्षितपणे पकडून रेस्क्यू केले. त्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगलात त्याची मुक्तता करण्यात आली. सर्पमित्र आकाश गोहिल यांनी सांगितले की, तस्कर हा साप बिनविषारी असून मानवासाठी घातक नाही. मात्र त्याचा आकार आणि वेगळी रचना यामुळे तो अनेकदा लोकांना घातक वाटतो. अशा प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांची मदत घ्यावी. हा साप चपळ असून तो उंदीर, बेडूक, अंडी, सरडे खातो. पर्यावरणीय दृष्टीकोणातुन तस्कर सापाला विशेष महत्त्व आहे.























